संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्यासाठी सन २०००-०१ पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत जनजागृतीचा व्यापक कार्यक्रम अंमलात आणण्यात आला. त्यामधून लोकांच्या पुढाकारामध्ये शासनाचा सहभाग असा नवीन विचार विकास योजनांना देण्यात आला. लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी या अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सुरु करण्यात आली आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ तसेच विविध उपक्रम व कार्यक्रमांतून सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छतेच्या मालमत्ता व साधन-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. सदर स्वच्छतेच्या मत्तांची व साधन-सुविधांची निगा राखणे, सुस्थितीत ठेवणे व त्यांचा सतत सुयोग्य वापर करणे, यासाठी मनुष्यबळ व निधी उपलब्ध करून स्वच्छता मत्तांची निर्मिती, दुरुस्ती व देखभाल करणाऱ्या ग्रामस्थ व ग्रामपंचायतींच्या प्रयत्नांची दखल घेवून, त्यांच्या प्रयत्नांकरिता ग्रामपंचायतींना रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देवून, त्यांचा गौरव या अभियानांतील स्पर्धेतून करण्यात येतो.
स्वच्छतेसंबंधित विहीत बाबी या अभियानातील विविध स्पर्धेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने कार्यपद्धती, गुणांकन निकष, तपासणी पद्धती यांत यथोचित बदल करून, सन २०२२-२३ व त्यापुढील कालावधीत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यासाठी नव्याने एकत्रित मार्गदर्शक सूचना, दिनांक ०७ ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत.
यानुसार संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेअंतर्गत जिल्हा परिषद गट स्तर, जिल्हा परिषद स्तर, विभाग स्तर व राज्य स्तरावर पात्र ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात येतात. या अभियानांतर्गत सांडपाणी व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन आणि शौचालय व्यवस्थापन या स्पर्धामध्ये पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विशेष पुरस्कारही प्रदान करण्यात येतात.
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे.
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे.
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा.