महाराष्ट्र शासन
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

Label
Label

स्वच्छ भारत मिशन - ग्रामीण

(1)स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण)

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) ही केंद्र पुरस्कृत महत्वाकांक्षी योजना यांच्यामार्फत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत राबविण्यात येत आहे.

ग्रामीण भागामध्ये स्वच्छते संदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी व उघडयावर मलविसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छतेवर आधारित अभियानाला 1986 मध्ये सुरुवात केली. त्यानंतर सन 2003-०४पासून केंद्र शासनाने संपूर्ण स्वच्छता अभियान सुरु केले. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावणे कामी महत्वाचा घटक असणाऱ्या स्वच्छते बाबत लोकचळवळ निर्माण झाली. या अभियानाचे दि.01 एप्रिल 2012 पासून निर्मल भारत अभियान असे नामकरण करण्यात आले होते. निर्मल भारत अभियानातून वैयक्तिक शौचालय बांधकामास प्राधान्य देण्यात आलेले होते. सन 2012मध्ये झालेल्या पायाभूत सर्वक्षणानुसार महाराष्ट्रातील एकूण 1,10,65,930 कुटुंबांपैकी 60,40,852 कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये नव्हती. अशा कुटुंबांपैकी दारिद्रय रेषेखालील सर्व कुटुंबे व दारिद्रयरेषेवरील-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, लहान व अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, शारीरिक दृष्टया अपंग आणि महिला कुटुंब प्रमुख यांना वैयक्तिक स्वच्छतागृह बांधून वापर सुरु केल्यास रु.4600/-इतके प्रोत्साहन पर अनुदान केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात येत होते. दिनांक 2 ऑक्टोबर 2014 पासून शासनाने निर्मल भारत अभियानाचे नामकरण स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)असे केले. केंद्र शासनाच्या दिनांक 28 ऑक्टोबर 2015 च्या पत्रान्वये वैयक्तिक शौचालयांच्या प्रोत्साहन अनुदानाच्या हिस्स्यामध्ये 75:25 (केंद्र व राज्य) वरुन 60:40 (केंद्र व राज्य) असा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार वैयक्तिक शौचालयाच्या लाभार्थी घटकांना रु.12000(केंद्र हिस्सा रु. 7200 व राज्य हिस्सा रु. 4800) प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)अंतर्गत सन 2012 च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार शौचालये नसलेल्या कुटुंबांपैकी एकूण 5७,४२,७२७ वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यात आले आहे. तसेच, ज्यांच्याकडे जागा/आवश्यक कागदपत्र नसेल,अशा उर्वरीत कुटूंबाना सामुदायिक, सार्वजनिक अथवा सामायिक शौचालये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

दिनांक 18 एप्रिल, 2018 रोजी संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र राज्य पायाभूत सर्वेक्षणानुसार हागणदारीमुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यानंतर पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या व पायाभूत सर्वेक्षणाबाहेरील वैयक्तिक शौचालय सुविधा उपलब्ध नाहीत अशा पात्र कुंटूंबाचा शोध घेऊन त्या एकुण १०,६०,९४२ पैकी १०,३४,४२७ कुटुंबांच्या वैयक्तिक शौचालयांची बांधकामे पूर्ण करण्यात येवून त्यापैकी १०,१४,९११कुंटूंबाना उत्तेजनार्थ अनुदानही वितरीत करण्यात आले आहे.

उपरोक्तनुसार स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट मोठया प्रमाणावर साध्य करण्यात आले आहे.

केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत महाराष्ट्र राज्यास राष्ट्रीय पातळीवर प्राप्त पुरस्कारांची यादी

१)क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या सन २०१६-१७च्या अहवालात देशातील प्रथम १० स्वच्छ जिल्हयांच्या यादीत महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व ठाणे जिल्हयांचा समावेश होता.
२) केंद्र शासनाचा स्वच्छता दर्पण सन २०१६-१७ पुरस्कार - सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व वर्धा
३)दक्षिण भारतातील सर्वात स्वच्छ जिल्हा सन २०१६-१७ पुरस्कार -सिंधुदुर्ग
४)स्वच्छता ही सेवा सन २०१७-१८ पुरस्कार - महाराष्ट्र राज्य प्रथम
५) स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ - महाराष्ट्रातील सातारा जिल्हा देशातील प्रथम जिल्हा म्हणून क्रमांकित तसेच देशातील प्रथम १० जिल्हयांमध्ये नाशिक, सोलापूर जिल्हयांचा समावेश होता.
६)स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा २०१९:-
राष्ट्रीय स्तरावर - महाराष्ट्र राज्य तृतीय क्रमांक
जिल्हा पुरस्कारांमध्ये - कोल्हापूर जिल्हा द्वितीय क्रमांक व
सातारा जिल्हा विशेष पुरस्कार
७)स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९ - महाराष्ट्र राज्याला विशेष पुरस्कार‍
दिनांक २ ऑक्टोबर, २०२० रोजी खालीलप्रमाणे पुरस्कार प्राप्त झाले आहेत :-
८)सामुदायिक शौचालय अभियान - महाराष्ट्र राज्य द्वितीय क्रमांक
जळगाव जिल्हा तृतीय क्रमांक
भंडारा जिल्हयातील कान्हाळगाव ग्रामपंचायत द्वितीय क्रमांक
यवतमाळ जिल्हयातील बोरीखुर्द ग्रामपंचायत तृतीय क्रमांक
९)गंदगीमुक्त भारत अभियान महाराष्ट्र राज्य तृतीय क्रमांक
(सर्वाधिक श्रमदान)

कोविड 19 च्या अनुषंगाने उपाययोजना:-

सध्याच्या कोविड १९ सारख्या संसर्गजन्य रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेत संपूर्ण स्वच्छतेचे अनन्य साधारण महत्व आहे. त्यानुषंगाने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत राज्यात कार्यरत स्वच्छाग्रहींना मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच स्वच्छाग्रहींच्या कार्यपध्दतीमध्ये बदल करण्यात आला असून त्यांना स्वच्छता साधन पुरविण्याबाबत दिनांक 20/4/2020 च्या शासन निर्णयांन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच, रॅपिड( प्रो (माहिती तंत्रज्ञान आधारित प्रणालीच्या माध्यमातून स्वच्छाग्रही, जलसुरक्षक व ग्रामसेवक यांच्या मार्फत ग्रामस्तरावरील पाणी व स्वच्छता विषयक स्थिती आणि गरजा समजून घेणे व प्रतिसाद वाढविणे बाबत सर्व जिल्हा परिषदांना कळविण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त दिनांक ०२ ऑक्टोंबर,२०१८ ते ०२ ऑक्टोंबर,२०२० या कालावधीमध्ये केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) या योजनेतंर्गत राज्याच्या ग्रामीण भागात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्याच्या ग्रामीण भागात दिनांक 8 ते 15 ऑगस्ट, 2020 या कालावधीत गंदगीमुक्त भारत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली आहे.

स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण)टप्पा-2:-

केंद्र शासनाने जुलै, 2020 मध्ये स्वच्छ भारत मिशन टप्पा-2 च्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून, सदर मार्गदर्शक सूचनांनुसार या योजनेंतर्गत कार्यवाही करावयाची आहे. संपूर्ण ग्रामीण स्वच्छता व स्वच्छता शाश्वत टिकविण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन (ग्रा) दुसऱ्या टप्प्यांतर्गत ग्रामीण भागातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी यापूर्वी कुटुंब संख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करुन देण्याची तरतूद होती. तथापि, केद्र शासनाच्या सुधारीत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन मार्गदर्शक सूचनांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करुन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)टप्पा २ करीता सन २०२०-२१ च्या वार्षिक कृती आराखडयामध्ये वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रोत्साहन अनुदान,सार्वजनिक शौचालय बांधकाम तसेच खालील कामे प्रस्तावित आहेत.

क्र कामें
1 Solid Waste Management in smaller villages
2 Solid Waste Management in bigger villages
3 Grey Water Management in smaller villages
4 Grey Water Management in bigger villages
5 Plastic Waste Management Unit (1 per block)
6 GOBAR-dhan Project
7 Fecal Sludge Management

स्वच्छ भारत मिशन (ग्रा) संबंधित केंद्र शासनाचे संकेतस्थळ विभागाच्या संकेतस्थळाला लिंक करण्यात आले आहे.

 

(2) संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान:-

ग्रामीण भागात अशुध्द पाण्यामुळे, अस्वच्छ परिसरामुळे व वैयक्तिक स्वच्छतेअभावी उद्भवणा-या रोगांमुळे पिडीत असलेल्या ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावणे हा ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, पर्यायाने जीवनस्तर, उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशा ग्रामस्थांचा/जनतेचा सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग कार्यक्रमात करुन घेण्याची प्रभावी तरतूद कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत असावी, ग्रामीण जनतेस हा कार्यक्रम0 आपला वाटावा व त्याचे महत्त्व पटून त्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळावा या दृष्टिकोनातून, सन 2000-01 पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात येत आहे. तसेच सन 2002-03 पासून स्वच्छतेशी व ग्रामविकासाशी निगडीत एखाद्या विशिष्ट क्षेत्रात भरीव काम करणा-या ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विशेष बक्षीसे देण्याचा उपक्रमही सुरु करण्यात आला आहे.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात सुटसुटीतपणा, अधिक सोपेपणा, पारदर्शकता व या अभियानाची व्याप्ती वाढवून महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घेण्याच्या अनुषंगाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना संदर्भात शासन स्तरावरुन यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय अधिक्रमित करुन नवीन दिनांक २५ एप्रिल, २०१८ च्या शासन निर्णयान्वये व त्यानंतर दिनांक 23 जुलै, 2019 च्या शासन निर्णयान्वये सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.